SSC HSC Time table 2026 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकर होणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर करत परीक्षांच्या तारखांना अंतिम मंजुरी दिली आहे.
बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू
बारावी बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होईल आणि बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व विभागीय मंडळांत एकाच वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांचाही समावेश असेल.
दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून
दहावी बोर्डाची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होऊन बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत चालेल. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांच्याही तारखा निश्चित
बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडतील. तर दहावीच्या प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षांसाठी २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आखण्यास याचा फायदा होईल.
नऊ विभागांत परीक्षा आयोजित
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या वतीने पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छ. संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागांत परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. लेखी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.